माझी ब्लॉग सूची

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

स्पंदन

स्पंदन

जगातील प्रत्येक घटक स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीजीवी माणसात तर स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची स्पर्धाच लागलेली असते. या स्पर्धेत अनेक जण भेटतात, भिडतात, काहीजण कोलमडून जातात तर काही अजिंक्य ठरतात. स्पंदन....! अस्तित्वाची निशाणी..... जिवंतपणाचे लक्षण.... स्पंदन.........! हृदयाची धकधक...... जाणीवेचा मार्ग.....!
स्पंदन प्रत्येक घटकात जाणवत असते. प्रेमात स्पंदन एकजीव होते... मैत्रीत कधी मदतीचा हात तर कधी त्यागाचे प्रतिक असते..... माणसांच्या गर्दीत हरवून जाते.... तर एकांतात उचमळून येते... वार्याच्या झुळुकीबरोबर साद घालते.. रानाच्या पात्यावर दवबिंदू होते... कधी पाखरांच्या भरारीवर स्वार होते... तर कधी इवल्याश्या खोप्यात हळूवात विसावते. निळ्याभोर आकाशात एकाकी तारा बनून असते स्पंदन... वळवाच्या मृदगंधातून दरवळून येते स्पंदन....! कविवर्य सुरेश भट एका कवितेत म्हणतात.

"पुन्हा माझ्या स्पंदनांची झाली फुले,
पुन्हा माझ्या अंतरात मत्त नभ झुले

झगमगे तारुण्याची पुन्हा दीपमाळ,
पुन्हा माझ्या प्राणावर चंद्रबिंब कले

आज माझा श्वास श्वास सुगंधकल्लोळ
आज माझा शब्द शब्द प्रकाशाचा लोळ

विसराळू आयुष्याला पुन्हा सापडली,
तुझ्या माझ्या आयुष्याची हरपली ओळ."
आयुष्य हि परमेश्वराची अमूल्य देणगी......! पण, जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर, दगड गोटे, खाचखळगे आणि काट्याकुट्यानी व्यापलेला...! मात्र, अंतरीचा भाव निकोप आणि निरागस असेल तर जीवनातल्या काट्याकुट्याचे रुपांतर मखमली फुलात व्हायला वेळ लागत नाही. स्पंदनातून माणसाची सुरुवात झाली. भाव मात्र माणसाने निर्माण केले. स्पंदनात जर सौंदर्याचा भाव असेल तर जग स्वर्गाहून सुंदर बनेल... खरच, जीवन सुंदर आहे याचे अद्वैतम ज्ञान मिळेल....! जीवनातल्या प्रत्येक क्षणातून स्पंदन बाहेर पडत असतं... कधी सोज्वळ हर्षातून.... कधी विरहाच्या आसवांतून..... कधी नदीच्या प्रवाहातून.... तरंगातून.... कधी सागराच्या लाटेतून, गर्जनेतून.... कधी रुसलेल्या काळ्याकुट्ट ढगातून.... कधी रेशीमबंध गुलाबी क्षणातून.... स्पंदन डोकावत असतं.
कवी संदीप माळवी म्हणतात-
" हारला प्रत्येक माझा श्वास आहे अन तरीही जिंकण्याचा ध्यास आहे.
फक्त तू हातात घ्यावा हात माझा अंतरीची एवढीशी आस आहे "
आपण कितीही पिचत पिचत जगात असलो तरी, चैतन्याचे आनंदाचे वारे हातातून निसटून दिले नाहीत तर स्पंदनाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर उल्हासित जीवनाचा उपभोग घेता येईल, शेवटी आपले जीवनच एक मोरपंखी अस्तित्व असते त्यामुळे इवल्याशा कुशीत ते जपायलाच ह

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

बाप

बाप
घरात गंजलेल्या खिळ्यावर
बापाचा मळका खमीस खुंटलेला
उभ्या आयुष्याच्या दुःखात
बाप अभिमन्यूसारखा गुंतलेला

पार खोल डोळ्यात त्याच्या
मला आसवांची ओल सापडायची
फोडाचे घट्टे पडलेल्या हातावर
माय आसवांचे अर्घ्य सोडायची

मूठ ठेऊन मोगड्यावर
बाप जणू कष्ट पेरायचा
समर्पित होऊन मातीशी
अंकुराइतका तो उरायचा

त्याच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यात
आभाळाएवढा अनुभव साठलेला
व्यथा-वेदनांचा वणवा
अखंड काळजात पेटलेला

उध्वस्त स्वप्न सारे
बिनबोभाट त्याने पांघरलेले
तळहातावर त्याच्या मला
दिसते नशीब नांगारलेले..
दीपक राखुंडे

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

जीवनाच्या वाटेत
ती मला भेटली
सहप्रवासी म्हणून ती
हवी हवी वाटली

तिला विसरण्याचा मी
कितीदा प्रयत्न केला
पण प्रत्येक प्रयत्न माझा
तिच्या आठवणीत गेला

सुखादुखांना जेथे
समजून घेतले जाते
अनमोल त्या प्रेम नात्याला
मैत्री म्हटले जाते

किती नाही म्हटलं तरी
तुझी मला आठवण येते
तुझ्या विरह यातनेने
मन गहिवरून जाते

भावनांचा सप्तरंग
हृदयात माझ्या दाटला
तुझ्या एका नजरेचा
कटाक्ष हवा वाटला

शांतीचा शोध


या माझ्या स्वतंत्र देशात
मला शांती हवी आहे.
ही शांती आहे तरी कोठे?
मला ती कोठे सापडेल?
आपल्याला काही ठाऊक आहे का?
मी वेडया-पिशासारखा
शांतीच्या शोधात फिरतो आहे.
शांती इथे मिळेल
शांती तिथे मिळेल
भटकत राहिलो रात्रंदिन
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
शोधून झाले सर्व काही
पण शांतीची कोणी देईना ग्वाही
बिहार झाले, गुजरात झाले
महाराष्ट्रही फिरून आलो
शांतीसाठी वेडापिसा झालो
शोधून झाली आंटीनाच्या जाळ्यांची शहरे
कोणी म्हणाले, खेडयाकडे जा रे
खेडीपाडीही वाट तुडवित गेलो
शोधून शोधून थकून गेलो
कोणी म्हणाले, इकडे पहा
कोणी म्हणाले, तिकडे पहा
पाहून पाहून डोळेही शीणले
तरी मी उसने अवसान आणले
मंत्रालय पाहिले
संत्रालय पाहिले
पाहून झाली सारी सत्ता
तरीही शांतीचा नाही मिळाला पत्ता
शाळा झाल्या महाविद्यालय झाले
रीत्या हातानेच परतावे लागले
आश्रम झाले, मठ झाले
पण शांतीचे दर्शन नाही झाले.
समोरच महात्मा गांधींचा पुतळा दिसला
त्यांनाच विचारावे वाटले
पळत जाऊन पुतळ्याला गाठले
गांधीजींना नक्की ठाऊक असले पाहिजे
गांधीजींच्या पायाशी बसलो
डोळ्यात पाणी थोडा मुसमुसलो
म्हणालो, बापू, तुम्ही तरी सांगा हो
शांती कोठे आहे?
बापू काही सांगणार एवढयात एकजण तिथे आला.
मला म्हणाला, काय हवे तुला?
मी म्हणालो, शांती हवीय मला
तो म्हणाला, अरे वेडया का उगीच
शोधतोयस शांतीला?
ती तर केंव्हाच गांधींबरोबर सती गेली.

वसंत बिपरे, माजलगाव, बीड.

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

श्रीगिरिजात्मजाची कथा



             आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन, तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्र रूपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र व सुंदर शरीर होते.
              गिरिजात्मज गणेशाने १२ वर्षे या क्षेत्रात तप केले. अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गणेशाचा 'मयुरेश्वर' अवतार झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.


लेण्याद्री


              अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्या आहेत.

               लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

श्रीविघ्नेश्वराची कथा



           फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले. ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारदमुनींकडून समजली. तो घाबरला. त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्याच क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्राने आज्ञा केली, 'अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर.' त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठेच संकट आले. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्या वेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला. 'मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो' असे त्याने देवांना आश्वासन दिले.
            मग गजाननाने पाराशरपुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, 'ज्या ठिकाणी माझे भजन-पूजन-कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये.' मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, 'तुमच्या नावामागे माझे नाव असावे. 'विघ्नहर' किंवा 'विघ्नेश्वर' असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे.' तथास्तु' असे म्हणून गजानन म्हणाला, ''मी आजपासून 'विघ्नेश्वर' झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे. 'विघ्नेश्वर' या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.''
              अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला; म्हणून गजाननास 'विघ्नेश्वर'' किंवा 'विघ्नहर' असे नाव या स्थानी प्राप्त झाले. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैरुत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली. हाच तो ओझरचा 'श्री विघ्नेश्वर विनायक' .


ओझर


              अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

              मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

              मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

कळळेच नाही




जगत होते आनंदी जीवन
प्रेम कधी झाले कळलेच नाही
प्रेम मनापासून करत होते 
नाते कधी जुळले कळलेच नाही
नात्यांचा पुर्णपणे स्विकार केला
बालपण केंव्हा संपले कळलेच नाही
कर्तव्याचा भार मनावर पडला 
स्वतःच्या इच्छा कधी कळल्याच नाही 
जुने नाते थोदे दुर गेले 
अश्रु कधी आले कळलेच नाही
माहेरच्या आठवणी विसरुन थोडया 
संसारात कधी रमले कळलेच नाही
रेवती किर्तनकार, परभणी

कळळेच नाही



जगत होते आनंदी जीवन
प्रेम कधी झाले कळलेच नाही
प्रेम मनापासून करत होते
नाते कधी जुळले कळलेच नाही
नात्यांचा पुर्णपणे स्विकार केला
बालपण केंव्हा संपले कळलेच नाही
कर्तव्याचा भार मनावर पडला
स्वतःच्या इच्छा कधी कळल्याच नाही
जुने नाते थोदे दुर गेले
अश्रु कधी आले कळलेच नाही
माहेरच्या आठवणी विसरुन थोडया
संसारात कधी रमले कळलेच नाही
रेवती किर्तनकार, परभणी

श्रीमहागणपतीची कथा


            फार प्राचीन काळी गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यांत पंडित असा ऋषी होऊन गेला. तो थोर गणेशभक्त होता. एकदा त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपले पुत्र मानले. 'मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादांक्रांत करून इंद्रालाही जिंकेन' असे तो मुलगा म्हणाला. मग गृत्समदाने त्याला 'गणानां त्वा' या गणेशमंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने वनात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याच प्रमाणे त्याला लोखंड, रूपे व सुवर्ण यांची तीन नगरेही दिली. 'या त्रिपुरांचा नाश भगवान शिवशिवाय कोणीही करणार नाही. भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करील व तुलाही मुक्ती मिळेल' असा वर गणेशाने दिला म्हणून तो मुलगा त्रिपुरासुर या नावाने प्रसिद्ध झाला.
           गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवन करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण गेले. त्रिपुरासुराचा वध करण्याचे शंकराने आश्वासन दिले. मग भगवान शिव त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुराचे व शिवाचे घनघोर युद्ध झाले; पण शिवाला त्रिपुरासुर आवरेना. तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितले की, 'युद्धारंभी आपण विघ्नहारी गणेशाचे स्मरण केले नाही' म्हणून विजय मिळाला नाही. मग नारदांनी शंकराला 'प्रणम्य शिरसा देव' हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितले. शंकरांनी त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली असता त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व 'मीच गणेश' असे सांगून वर मागण्यास सांगितले. त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला. तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला व या स्थानाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाला.
           मग शिवाचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध झाले व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा व त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावे म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्रीमहागणपतीच्या मूर्तीची स्थापना व आराधना केली; तोच हा मणिपूरचा रांजणगावचा श्री महागणपती .
रांजणगाव
 

            अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

           या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारीवदे महागणपती असेही म्हटले जाते.

          अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

           हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.