माझी ब्लॉग सूची

रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०

मार्ग

चालतो मी सारखा हा
चालण्याला अंत नाही
चाललो कोठे कशाला
हीहि आता खंत नाही

एकदा पूर्वी मलाही
वेड होते शोधण्याचे
वेदनेवाचून काही
लाभ झाला त्यात नाही.

जाणत्या थोराकडेही
खूप केली चौकशी मी
शब्दजालातून कळले
अज्ञतेला पार नाही.

योजनेचा या नकाशा
ज्या ठिकाणी ठेवलेला
खंडकाने वेढलेल्या
त्या स्थळाला दार नाही.

ना कळावे हीच इच्छा
जो कुणी आहे तयाची
शोधतो त्याच्या कृपेचा
शोधका आधार नाही.

मी म्हणोनी सोडला तो
नाद आता मंझीलाचा
चालण्याचे श्रेय आहे
अन्य धर्माचार नाही।

-कुसुमाग्रज