माझी ब्लॉग सूची

सोमवार, १० मे, २०१०

श्वास घेतला सहज…

माझ्या ओंजळीत शब्द…
काही सांडले त्यातले,
त्यांना वेचून घेताना…
रंग भावनांना आले !

आसवात नाहताना…
किती भिजली अक्षरं,
कुठे जाई जुई कळ्या…
कधी कातळ पत्थर !

कवितेच्या जन्मासाठी…
किती कळा या सोसल्या,
किरणात शितलता…
आणि प्रखर सावल्या !

नको येऊ म्हणताना…
सत्य कल्पनेत आलं,
श्वास घेतला सहज…
झाली कवितेची ओळ !

जीव माझा एकला..

गगनात उडतोय
सा~या पक्ष्यांचा थवा
धरतीवर फिरे
जीव माझा एकला..

आत्मभान हरपले
जीव असा वेडावला
आंगणात मनाच्या
पडतो विचारांचा सडा..

कोणी कोणी ना जवळ
कोणी नाही रे असा
मनी होते हळहळ
समजावू कशी कुणाला..

सारी दूर गेली नाती
सोडून एकले ह्या जीवा
होईल कधी सांजवेळ
परतेल कधी पक्ष्यांचा थवा..

साथ आता केवळ मनाची
मनी आस धरायाची
होईल कधी सुटका जीवाची
घटका केवळ मोजायाची…

शब्दांची फुलपाखरे

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली …
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी …

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली…
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी …
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

- श्वेता