घरात गंजलेल्या खिळ्यावर
बापाचा मळका खमीस खुंटलेला
उभ्या आयुष्याच्या दुःखात
बाप अभिमन्यूसारखा गुंतलेला
पार खोल डोळ्यात त्याच्या
मला आसवांची ओल सापडायची
फोडाचे घट्टे पडलेल्या हातावर
माय आसवांचे अर्घ्य सोडायची
मूठ ठेऊन मोगड्यावर
बाप जणू कष्ट पेरायचा
समर्पित होऊन मातीशी
अंकुराइतका तो उरायचा
त्याच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यात
आभाळाएवढा अनुभव साठलेला
व्यथा-वेदनांचा वणवा
अखंड काळजात पेटलेला
उध्वस्त स्वप्न सारे
बिनबोभाट त्याने पांघरलेले
तळहातावर त्याच्या मला
दिसते नशीब नांगारलेले..
दीपक राखुंडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा