या माझ्या स्वतंत्र देशात
मला शांती हवी आहे.
ही शांती आहे तरी कोठे?
मला ती कोठे सापडेल?
आपल्याला काही ठाऊक आहे का?
मी वेडया-पिशासारखा
शांतीच्या शोधात फिरतो आहे.
शांती इथे मिळेल
शांती तिथे मिळेल
भटकत राहिलो रात्रंदिन
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
शोधून झाले सर्व काही
पण शांतीची कोणी देईना ग्वाही
बिहार झाले, गुजरात झाले
महाराष्ट्रही फिरून आलो
शांतीसाठी वेडापिसा झालो
शोधून झाली आंटीनाच्या जाळ्यांची शहरे
कोणी म्हणाले, खेडयाकडे जा रे
खेडीपाडीही वाट तुडवित गेलो
शोधून शोधून थकून गेलो
कोणी म्हणाले, इकडे पहा
कोणी म्हणाले, तिकडे पहा
पाहून पाहून डोळेही शीणले
तरी मी उसने अवसान आणले
मंत्रालय पाहिले
संत्रालय पाहिले
पाहून झाली सारी सत्ता
तरीही शांतीचा नाही मिळाला पत्ता
शाळा झाल्या महाविद्यालय झाले
रीत्या हातानेच परतावे लागले
आश्रम झाले, मठ झाले
पण शांतीचे दर्शन नाही झाले.
समोरच महात्मा गांधींचा पुतळा दिसला
त्यांनाच विचारावे वाटले
पळत जाऊन पुतळ्याला गाठले
गांधीजींना नक्की ठाऊक असले पाहिजे
गांधीजींच्या पायाशी बसलो
डोळ्यात पाणी थोडा मुसमुसलो
म्हणालो, बापू, तुम्ही तरी सांगा हो
शांती कोठे आहे?
बापू काही सांगणार एवढयात एकजण तिथे आला.
मला म्हणाला, काय हवे तुला?
मी म्हणालो, शांती हवीय मला
तो म्हणाला, अरे वेडया का उगीच
शोधतोयस शांतीला?
ती तर केंव्हाच गांधींबरोबर सती गेली.
वसंत बिपरे, माजलगाव, बीड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा