इंद्राघरचे पिउनि रसायन प्रधान आमुचे आले.
अलकेतील चीर यौवन येथे रूप काश्मिरी ल्याले.
चरण धरेवर शीर मेघावर कसरत कौतुकशाली
नक्षत्रांशी वरती चर्चा पद ठेचाळत खाली.
मुलात काका जगात स्नेही गुरुजी भारत देशी
छडी परजती कधी प्रजेवर मग्न कधी उपदेशी.
उडया घालती सभासागरी-पोलिसखाते तंग-
नाच जंगली जनात करती मुक्त खेळती रंग.
गतीत रमती, देशोदेशी फिरते नित्य विमान
निर्यातीच्या गटात यांचा केवळ पहिला मान.
सुत कातती पुकारती पण अणूयुगाची द्वाही
जनशाही स्थिर करण्यासाठी वरती नायकशाही.
थोडे पंडीत थोडे इंग्रज थोडी मोगल शान
कवी मीमांसक समाजवादी गांधीचा अभिमान
दावा पहाडी-कस्तुरी केशर परवानग सोमल काही
स्पतीकाचा घट, असे विलाखन मिश्रण नाही.
ताईत कुठला गळ्यात आहे कुणास ना हे कळले
मते घेउनी त्यांच्यामागे धावती पण मतवाले.
विशाल नयनी परंतु केव्हा पहा वेदना साचे
शब्दावाचुनी त्यात उकळते मानस मानवतेचे.
अतर्क्यतेतही एकाच निश्चित -आज वादळी रात
गहन तमी हा एकच जळतो नंदादीप जगात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा