माझी ब्लॉग सूची

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

मर्म

असा असे कि तसा असे मी
मीच मनाला पुसतो
उतार नसलेल्या गणिताचे
घुसळत पाणी बसतो.

घनश्याम मी मीच सुधाकर
तळीरामही मीच
मीच केधवा कीचक होतो
बलशाली अन नीच.

अशी मनाच्या रंगमंचकी
बहुविध पात्रे जमती
माझे मीपण कसे नेमके
त्यातुनी यावे हाती!

इतर जनांच्या व्यक्तित्वाचे
कीर्तन पडते कानी
उदार अमके कणखर तमके
ते मोठे अभिमानी !

कातरलेला कानसलेला
स्वभाव अपुला नाही
खंत मनाला कधी कधी ही
उगाच टोचत राही.

परंतु जेव्हा मलाही मिळते
लेबल 'ऐसे तैसे '
मर्म कळे मज जनरीतीचे
सुटते कुट जरासे.

निराकारता संमत नाही
ना समजे आम्हा ती
म्हणून तिजवर लिंपित बसतो
ही रेषांची माती!

-कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा