अशी माणसे खुळीबावळी जाती बाजारात
कमी आणती जिन्नस पैसा जास्त सदा देतात.
असो नसो गाडीला गर्दी जागा नसते यास
उभ्या उभ्याने प्रवास करती त्रास नको कोणास.
घड्याळ असते जवळ परी ते किल्लीवाचून बंद
विलंब करिती सर्व ठिकाणी चाल मुळातच मंद.
हारावती सदऱ्याच्या गुंड्या, बूट सापडे एक
मुदत बार झाल्यावर जाती वटवायाला चेक.
कागद हरवे कचेरीत, ते मेजाखाली शिरती,
धांदलीत त्या पैसे पडती, दौत सांडते वरती.
पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी
वावरती या जगात परंतु अन्य जगात पथारी.
परी केधवा अघटीत घडते, काहि पणाला लागे
अशा बावळ्यामधून होती ज्वालांचे गिरी जागे.
अशा खुळ्याच्या जामावातुनी महाखुळे ते येती
जनावरातुनी माणसास जे पुढे जरासे नेती.
महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे
रुपयांसह पेटीत ठेवतो दोनचार हे तारे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा