आपण काहीवेळा जीवनापासून पळून जावू इच्छितो. दूर दूर जावे असे वाटते. तयारीही करतो आपण, जावू लागतो... पण आपण कितीही वेगात पळत सुटलो तरी आपली सावली आपल्यापासून दूर राहते का? मग जीवन तरी कसे सुटेल? जीवन म्हणजे काही लोकसत्तेचे कोडे नव्हे, कीं ज्याला पहिले बक्षीस मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. जीवन म्हणजे साधे सुटसुटीत, गुलाबाच्या फुलाप्रमाणे वाटणारे काव्य आहे. गुलाबाजवळ काटे आणि जीवनापाशी व्यवहार हा अटळ आहे.
कुणी म्हणतात-जीवन हा संग्राम आहे. संग्राम हा नाही कुठे? साधी वस्तू विकत घेतानासुद्धा लोक संग्रामाच्या तयारीने जातात. एक शेजारीण दुसरीशी बोलताना वाकयुद्धाच्या सामुग्रीनिशी हल्ला करते. अशा युद्ध प्रव्रुत्तीने तुडूंब भरलेल्या लोकांना हवे तर म्हणू देत. "-जीवन हा संग्राम आहे!" जीवनात संग्रामातील क्रौर्य दिसणार नाही. युद्धातील रक्तपात येथे दिसणार नाही. क्रौर्याऐवजी निसर्गाची ममता आणि रक्ताच्या लाल रंगाऐवजी अरुणोदयाचा लाल रंगच निसर्गाला जास्त प्रिय आहे. निसर्ग वस्तू निर्माण करतो. काळ वाईट गोष्टी हिरावुन घेतो. अशा तर्हेने निसर्ग आणि काळ यांची नेहमीच तडजोड चाललेली असते. काळ सांगतो "-निसर्गा, नको रे असल्या गोष्टी." निसर्ग मात्र आपला बालहट्ट चालुच ठेवतो. पण काळ त्याला दूर भविष्याकडे बोट दाखवतो. व त्याला खेळायला पाठवून देतो, व त्याच्या जवळील वाईट गोष्टी आपण काढून घेतो, जसे-आई.. आई मुलाच्या हातातील काठी वगैरॆ काढून घेते. निसर्ग आणि काळ जर तडजोड करतात. तर मग निसर्गाच्या प्रशांत मांडीवर खेळणार्या आपल्या जीवनाला तडजोडींचे महत्व नाही काय?
निसर्गाने निर्माण केलेल्या मानवाचे जगणे म्हणजेच जीवन. जीवनसागरात होडी हाकारली की सुकाणू कोणत्या दिशेने फिरवावा याचा विचार माणूस करु लागतो. मार्गात त्याला व्यवहाराचे खडक लागतात. आपली नौका तेथे आपटून फूटू नये, म्हणून त्यांना वळसा घालुन घालुन जावे लागते. पाण्याचा वेग वाढला कि आपली होडी तीरावर आणून थोडावेळ थांबावे लागते. संसाराच्या रखरखीत जागेत प्रेमाचे व्रुक्ष लावून सावली निर्माण केली जाते. थंडीने काकडल्या जाणार्या देहाला लोकरीची वेश्रुणे घातली जातात. ही सगळी तडजोड नव्हे काय? भूक लागली कि जेवणे तहान लागली कि पाणी पिणे. या साध्या गोष्टीतून सूद्धा तडजोडचं प्रगट होत नाहे काय?
मनुष्य म्हणेल-" भूक लागली तरी मी जेवणार नाही." पोट म्हणेल- "बरं! मीही आपले काम करणार नाही, काम बंद ठेवीन."संपले! सुरू झाला झगडा.. अशा संग्रामाने जीवन जगू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागते.. रोजचा व्यवहार घ्या. पाच मिनीटांचा मार्ग. बसमधुन जाताना आपण स्वतः बसलेल्या असतो. व एखादी बाई लहान मुलाला घेऊन बसमध्ये चढते. अशावेळी तिला जागा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नाहीतर तीने जागा द्या म्हणावे आणि आपण भांडावे, नाही म्हणावें. हा संग्राम करण्यापेक्षा तडजोड करुन माणूसकीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर नाही काय? अशा तर्हेने आई-मूल, नवरा-बायको, भावंडे इ. आसपासचे लोक, प्रत्येक प्राणी, व्यवहार यांच्याशी तडजोड न करताच जगणे अशक्य आहे. संग्राम हा जीवनातील थोडासा भाग होवू शकेल पण जीवन नव्हे. संग्राम जीवनाचा थोडा भाग असेल पण तडजोड म्हणजेच पुर्ण जीवन!
Sundar vichaar aahet
उत्तर द्याहटवाhyalach jivan ase god nav ahe...ani apan te godine jagle pahije..
उत्तर द्याहटवाAawadle..
उत्तर द्याहटवाChhan lihley..